May 17, 2022
girls wearing

मुली जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांच्यात हे मुख्य बदल आढळून येतात, पालकांनी लक्ष्य दिले पाहिजे…

एक वेगळीच कलाटणी देणारा हा टप्पा असतो. तिच्या शरीराचा बांधा, मनातील विचार, बौद्धिक क्षमता हे सारे बदलते. तिच्या मनातील तो गोंधळ कोणालाच समजून नाही येत. बालपनातून तारुण्यात ती प्रवेश करत असते. या वयात ती खुप भावनिक असते, तिचे मन नाजुक बनते. मनाला आवर घालणे कठिण होऊन जाते. पण मनाला आवर का घालावा हा सुध्दा प्रश्न तिला भेडसावत असतोच. या प्रश्नाचे उत्तर पालकांनी मुलींना देणे गरजेचे असते. कारण मुलिचे अत्यंत जवळचे मित्र म्हणजे पालकच असतात. त्यामधे अगदी चांगली मैत्रीण ही आई असते.

मुलीची जसजशी वाढ होताना दिसेल तशी पुढे जाऊन तिच्यामधे जे बदल होणार आहेत त्याबद्दल तिला पूर्व सुचना देणे हे आईचे कर्तव्य आहे. मुलीच्या शरीरात हे बदल का होत आहेत हे तिला स्पष्ट करायलाच हवे. मुली जशा मोठ्या होतील तशी वयाच्या बारा वर्षानंतर च तिच्या शरीरात हळुहळू बदल होण्यास सुरुवात होते. तिच्या चेहऱ्यावर मुरूम येतात, तेज येते, उंची वाढते, कमरेत साधारण गोलाकार येतो, त्यांना स्वतःला त्या जाड वाटायला लागतात, छोट्या छोट्या गोष्टी वर त्यांची चिडचीड होते, सर्व गोष्टींचा त्या मनाने विचार करतात, मनाला एखादी गोष्ट नाही पटली तर त्या लगेच नरवस, दुःखी होतात, अर्थातच त्या खूप भावनिक बनतात, मुलांकडे त्या आकर्षित होऊ लागतात.मग वयाच्या पंधरा सोळा नंतर त्यांना मासिक पाळी सुरू होते.

मासिक पाळी ही अगदी नैसर्गिक असते, ती प्रत्येक स्त्रीला येतेच. मासिक पाळी येणे किंवा सुरू होणे ही काही वाईट गोष्ट नाही उलट ही तर स्त्री साठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे तिच्या शरीराला शुद्धता मिळते, तिच्या चेहऱ्यावरील तेज, तिचे आरोग्य वाढते. आणि यामुळे तिला पूर्ण जगाची जननी मानले जाते. पण ही मासिक पाळी स्त्रीला च का येते किंवा ती कशी येते, ती आल्यावर मुलींनी काय करावे? मुलींच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आई ने, किंवा घरातील तिच्या मोठ्या बहिणीने, मैत्रिणीने देणे फार गरजेचे असते. कारण हा नैसर्गिक बदल जर मुलींना नाही समजला तर घाबरुन जातात. त्यांचे मन अस्थिर होते.

मासिक पाळी येताच आपण काय करावे किंवा काय करु नये, हे त्यांना स्पष्ट पणे सांगायलाच हवे. काही घरात आई नसते मग त्या आईचे कर्तव्य मोठ्या बहिणीने करावे, या दोघीही नसतील तर हे काम वडीलांनी करावे, एक मुलगी ही शेवटी एक स्त्री असते, तिच्या सोबत तिच्या शरीरातील होणारे बदल, तिच्या मासिक पाळी बद्दल स्पष्टीकरण देणे खरच एका वडिलांसाठी कठिण असते. पण तरिही आपल्या मुलीला हे सांगणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. अशा वेळी एक वडिल नाही तर मित्र बनुन तिच्याशी संवाद करावा. कारण जोवर पालक आपल्या मुलीचे मित्र, सहयोगी बनत नाही तोवर तिला या जगाची ओळख होत नाही, अनुभव येत नाही, कोणत्याही गोष्टीतील चांगले, वाईट समजत नाही.

त्यामुळे मुलीच्या या नाजूक वयातील चांगल्या, वाईट गोष्टींची त्यांना पूर्वकल्पना द्यावी. या मासिक पाळी मधे पॅड कसे वापरावे, ते का वापरावे हे सुद्धा त्यांना स्पष्ट पणे सांगावे. आपण स्पष्ट बोलल्याने त्यांच्या मनातील गोंधळ थोडा कमी होण्यास मदत होते. त्यांच्या शरीरातील, मनातील बदलामुळे मुलांकडील त्यांचे आकर्षण वाढत असते त्यामुळे आपण त्यांना त्यांच्या मैत्रितल्या मर्यादा समजावून सांगितले पाहिजे, जेणेकरून त्या स्वतःहून सावध राहतील.

हल्लीच्या काळात, स्त्रियांची खूप धावपळ होत असते त्यामुळे त्यांचे घरात लक्ष कमी असते, आणि आपल्या मुलीकडे ही. तिच्या शरीरातील बदल, त्यांचा बदलता स्वभाव याकडे दुर्लक्ष होत असते. पण हे चुकीचे आहे. वयात येणाऱ्या मुलीवर तिच्या आईचे लक्ष असायलाच हवे.तिच्याशी निःसंकोचपणे संवाद केलाच पाहिजे. या वयात तिने कसे कपडे घालावे, कसे वागावे, हे सांगायलाच हवे. तिचे बोलणे, चालणे, खेळताना स्वतःकडे कसे लक्ष ठेवावे. हे सुद्धा सांगावे.

फक्त आईच नाही तर सर्व स्त्रियांनी मग त्या मैत्रिणी असो, टीचर असो, शेजारी असो, नातेवाईक असो ,बहिण असो किंवा मग आई असो वयात येणाऱ्या मुलींना त्यांच्यातील होणारा बदल न लाजता त्यांना सांगितला पाहिजे. त्यांनी घ्यावयाची काळजी सांगितली पाहिजे. कारण हा बदल तिच्या साठी खूप नविन असतो.

जर याच्या बद्दल तिला पूर्वकल्पना दिली तर या नैसर्गिक बदलाला ती आनंदाने स्वीकारेल. आणि मग ती आपली बहिण असो किंवा मैत्रिण या समाजात न लाजता, न डगमगता उत्साहाने, धाडसाने वावरेल. यशाला गाठेल. पण तिला हे नैसर्गिक बदल समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण केलेच पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.